पंढरपूर - उजनी धरणातील पाण्यावरुन आंदोलन करत शासनविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर उर्फ भैय्या देशमुखांसह उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या चौदा जणांविरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश भंग करून उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्यात येऊ नये याकरिता देशमुख आणि सहकाऱ्यांनी आंदोलन केले.
चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यावेळी पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना अरेरावीची भाषा वापरून त्यांच्याशी हुज्जत घातली म्हणून प्रभाकर भैय्या देशमुख (रा. पाटकूल ता. मोहोळ), अतुल खुपसे (रा. उपळवाटे, ता. माढा), माऊली हळणकर (रा. ईश्वर वठार, ता. पंढरपूर), दत्ताभाऊ व्यवहारे (रा. पांढरेवाडी, ता. पंढरपूर), विठ्ठल मस्के (रा. शेवरे, ता.माढा), आण्णासाहेब जाधव (रा.तांदुळवाडी, ता.माढा), किरण भांगे, बापू दादा मेटकरी (रा. पाटकळ, ता.मंगळवेढा), बळीराम गायकवाड (रा.रिधोरे, ता. माढा), जयप्रकाश मोरे,औदुंबर केरू गायकवाड (रा. रोपळे कव्हे, ता.माढा), धनाजी विष्णू गडदे, श्रावण लवटे (रा.नंदेश्वर ता. मंगळवेढा), अभिजीत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
1 मे रोजी जलसमाधी आंदोलन
राज्य शासनाकडून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले पाच टीएमसी पाणी देण्यात येऊ नये, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेसह उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने 1 मे रोजी शनिवारी रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार होते. उजनी धरणात जाऊन भैया देशमुखांसह 14 जणांनी आंदोलन केले होते. , इंदापूर तालुक्याला मंजूर झालेले पाच टीएमसी पाणी तात्काळ रद्द करावे. उजनीचे पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आहे यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या म्हणून गुन्हा दाखल
सकाळी अकराच्या सुमारास धरणातील उस्मानाबाद पाणीपुरवठा योजना व एनटीपीसी पाणीपुरवठा केंद्राच्या मधोमध संघर्ष समितीचे देशमुख व त्यांचे सहकारी जमले. त्यावेळी केंद्रे यांनी कोविड- १९ या साथरोगाच्या अनुषंगाने जमावबंदीचा आदेश असल्याचे सांगून आंदोलन न करण्याचे आवाहन केले.परंतु आंदोलकांनी अरेरावीची भाषा वापरून हुज्जत घातली. त्यांचे काहीही न ऐकता धरणाच्या पाण्यात जाऊन शासनाविरुद्ध घोषणाबाजी करीत आंदोलन केले. पोलिस कॉन्स्टेबल किशोर तळेकर यांनी फिर्याद दिली. हवालदार स्वामीनाथ लोंढे तपास करीत आहेत.