पंढरपूर - राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्री आर्यन खानच्या प्रकरणांमध्ये दररोज, सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्रकार परिषद घेतात. पण राज्यातील एसटी मंडळाच्या 28 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात राज्यातील परिवहन मंत्री किंवा एसटी मंडळातील एकही अधिकारी आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी गेला नाही. मात्र ठाकरे सरकारला गांजावाल्या लोकांची काळजी लागून राहिल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात पत्रकार परिषदेमध्ये केली.
'संप मोडून काढण्याचा प्रयत्न'
राज्यातील परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात ठाकरे सरकार एक शब्दही काढत नाही. परिवहन मंडळाचे कर्मचारी लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत आहेत. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
'गेंड्याच्या कातडीचे सरकार'
एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. परिवहन मंडळाच्या संघटनेमध्ये फूट पाडत संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे.