पंढरपूर (सोलापूर) - शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजप नेते शिरीष कटेकर यांना, शिवसेनेकडून तोंडाला काळे फासले व मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पंढरपूर शिवसेना शहराध्यक्षसह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 17 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शिरीष कटेकर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका
4 फेब्रुवारी रोजी भाजपकडून राज्यभर वीज बिल वसुलीविरुद्ध टाळेबंदी आंदोलने करण्यात आली. पंढरपूर येथील वीज मंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली टाळेबंद आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनादरम्यान भाजप नेते शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यातूनच संतापलेल्या पंढरपूर शहरातील शिवसैनिकांकडून 6 फेब्रुवारी रोजी कटेकर यांना तोंडाला काळे फासण्यात आले. बांगड्या, साडी व बुक्का देऊन त्यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना शहराध्यक्ष रवी मुळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात कटेकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवला होता.
शिवसेना व भाजप आमने-सामने
भाजप नेते कटेकर यांनी सात फेब्रुवारी रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. त्यातून 25 शिवसैनिकांविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये, मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देणे अशा स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून सतरा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही पडताना दिसले. माजी खासदार गिरीट सोमय्या, आमदार राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याची धमकी दिली आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप राजकारण तापताना दिसत आहे.
हेही वाचा - पदवीधरांसाठी स्थापन करणार स्वतंत्र महामंडळ - आमदार अरुण लाड
हेही वाचा - नात्याला काळीमा! पंढरपुरात बापानेच केला मुलीचा विनयभंग