सोलापूर - मागील चार महिन्यांपासून पगार नाही.. उपाशी आहोत.. पगार द्या.. ओ.. साहेब.. पगार द्या.. अशी आर्त हाक देत रुग्णवाहिका चालक व मालकांनी, रुग्णवाहिका गाड्या थेट सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर आणून थांबवल्या. मंगळवारी दिवसभर हे आंदोलन सुरूच होते. महापालिकेने अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णवाहिका चालक व मालकांनी हे आंदोलन केले. आंदोलकांनी आठ रुग्णवाहिका गाड्या महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर उभी केल्या. यामुळे दालनासमोर जागाच शिल्लक राहिली नव्हती.
सोलापुरात 12 एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर झपाट्याने रुग्ण संख्या वाढत गेली. कोरोना रुग्णांचा 20 हजारांचा टप्पा ओलांडला. सोलापूर महानगरपालिकेने 10 मे रोजी शहरातील 10 खासगी रुग्णवाहिका अधिग्रहित केल्या होत्या. या रुग्ण वाहिकांच्या मालकांना आरटीओच्या नियमानुसार रक्कम देण्यात येणार होती. परंतु मागील चार महिन्यांपासून एक दमडी देखील या रुग्णवाहिका मालकांना देण्यात आली नाही.
रुग्णवाहिका मालकांना सोलापूर महानगरपालिकेकडून रक्कमच मिळाली नसल्याने ते चालकांना कुठून पगारी देणार? असा सवाल उपस्थित करत मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर रुग्णावाहिका उभी करुन आंदोलन करण्यात आले. दिवसभर आठ रुग्णवाहिका गाड्या आयुक्तांच्या दालनासमोर उभ्या होत्या. या प्रश्नावर कोणताही तोडगा न निघाल्याने सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, रुग्णवाहिका चालक व मालक गाड्या आयुक्तांच्या दालनासमोरच उभे करून निघून गेले. यावेळी श्रीशैल रोडगे, नासिर जहांगीर शेख, पिंटू पाटोळे, अजय जाधव, दिगंबर इप्पलपल्ली, श्रीकांत राठोड आदी उपस्थित होते.
हेही वाचा - उजनी परिसरात 100 मिलिमीटर पावसाची नोंद, भीमा नदीत 16 हजार 600 क्सुसेकने विसर्ग
हेही वाचा - सोलापूरकरांना उपकर भरावाच लागणार - मनपा आयुक्त