सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आजपासून सुरू होणारी तळकोकणातील जनआशीर्वाद यात्रा प्रदेश कार्यकारिणीकडून काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू, नारायण राणेंच्या यात्रेसमोर प्रश्चचिन्ह
मनाई आदेश असतानाही जिल्ह्यात सत्ताधारी नेते, मंत्री फिरतातच
जिल्ह्यात मनाई आदेश असला तरी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी कोणाच्या आदेशाची गरज नाही. सिंधुदुर्ग हे राणेंचे होमपीच आहे. मनाई आदेश असतानाही जिल्ह्यात सत्ताधारी नेते, मंत्री फिरतातच. जेव्हा केंद्रीय उद्योगमंत्री राणेंचा दौरा निश्चित होईल, तेव्हा जिल्ह्यातील मनाई आदेश मागे घेतला जाईल, असेही तेली म्हणाले. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राज्य सरकार बिथरले, त्यामुळेच राणेंवर अटकेची कारवाई केली, असा आरोपही तेली यांनी केला.
जिल्ह्यात दिवाळी - दसरा सणासारखे उत्साही वातावरण
राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी जिल्ह्यात दिवाळी - दसरा सणासारखे उत्साही वातावरण झाले होते. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गातील भाजप कार्यकर्ते आणि जनता प्रचंड उत्साही आहे. तांत्रिक अडचणीमुळे यात्रा पुढे ढकलण्यात आली असून दोन दिवसांत यात्रेचे रिशेड्युल कळविण्यात येईल, असे तेली म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांचा राणेंच्या अटकेबाबत पोलिसांवर दबाव टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राणेंना झालेली अटक ही सूडबुद्धीने केल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोपही तेली यांनी केला.
पालकमंत्री जिल्हावासीयांची फसवणूक करत आहेत
पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हावासीयांची फसवणूक करत आहेत. सत्ताधारी केवळ विकास प्रकल्पाची घोषणा करतात, पण पूर्तता करत नाहीत. सी वर्ल्ड, आडाळी एमआयडीसी, नाणार प्रकल्पाला विरोध केला. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या माध्यमातून कोकणचा विकास होणार, हे स्पष्ट आहे. राणेंना केलेल्या अटकेची किंमत राज्य सरकारला कोकणी जनता मोजायला लावेल, असा इशाराही तेली यांनी दिला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.
जनाशीर्वाद यात्रेचे लवकरच रिशेड्युल येणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार होती, मात्र काल घडलेल्या घेटनेमुळे ही यात्रा पुढे ढकललेली आहे. ही यात्रा भाजप प्रदेश कार्यालयाकडून लवकरच रिशेड्युल करण्यात येणार आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर झाडे तोडून वाहतूक केली बंद