सिंधुदुर्ग - यूजीसीच्या निर्देशानुसार येत्या २ ते ३ दिवसात महाविद्यालयीन परीक्षा संदर्भात शिक्षण खाते निर्णय घेणार आहे. एफ. वाय. आणि एस. वायच्या परीक्षा १ जुलैपासून १५ जुलै पर्यंत संपवाव्यात आणि १२ नंतरचे प्रवेश लवकरात लवकर करुन १ सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करावी, असे निर्देश यूजीसीने दिले आहेत. त्यानुसारच परीक्षेचे वेळापत्रक तयार केले जाईल. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना हे वेळापत्रक दाखवून परीक्षा जाहीर केल्या जातील, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा- Global Covid-19 Tracker : जगभरामध्ये 2 लाख 28 हजार दगावले...
यूजीसीने महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठांना दिलेल्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कुलगुरुंची समिती स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये २ डायरेक्टर्स आहेत. त्यांची बैठक शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सने होईल. तर शनिवारी पुन्हा एकदा सगळ्या कुलगुरुंची व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय आणि वेळापत्रक तयार केले जाईल.
मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या निदर्शनास ते वेळापत्रक आणून देऊ आणि त्याच्यानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही जाहीर करू असे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृहावर ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित होते.