सिंधुदुर्ग - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे 'फळांचा राजा' म्हणून ओळख असलेल्या हापूस आंब्याला चांगलाच फटका बसला आहे. सिंधुदुर्गासह कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादकांना हातभार म्हणून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार जिल्हा कृषी विभागाने पासचे वितरण करून १ हजार ५९० टन आंबा स्वतःच्या अखत्यारित पाठविला आहे.
आंबा हे फक्त उन्हाळ्यात मिळणारे फळ असून त्यातही सर्वाधिक मागणी असलेला हापूस हे तितकेच नाजूक आणि नाशिवंत फळ आहे. लॉकडाऊनमध्ये याच्या विक्रीचे मार्ग खुंटल्यामुळे सिंधुदुर्गासह कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत आले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा कृषी विभागानेही मोठा हातभार लावत या बागायतदारांचा आंबा बाजारपेठेत पाठविला आहे.
एकूण १ हजार १३० वाहनांमधून ८८ हजार ३६२ पेट्या जिल्हा प्रश्नाच्या माध्यमातून विक्रीसाठी गेल्या आहेत. त्याशिवाय स्वतः शेतकरी व शेतकरी समूहामार्फात स्थानिक व जिल्ह्य बाहेरील बाजारपेठेमध्ये सुमारे ५ हजार टन आंब्याची विक्री करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बागल यांनी ही माहिती दिली.