सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'शिवभोजन थाळी योजने'चा जिल्ह्यातील गरजूंना चांगल लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हा मुख्यालयातील जिल्हा विकास यंत्रणेच्या गाळ्यांमध्ये शिवभोजन थाळी केंद्राची सुरुवात झाली. बचतगटाच्या एका महिलेने या केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत केले. तसेच शिवभोजन थाळीतील पदार्थांचा आस्वादही त्यांनी घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेची सुरुवात करताना विशेष आनंद होत असल्याचे पालकमंत्री म्हणाले. गरीब आणि गरजू लोकांसाठी ही एक चांगली योजना असून याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. भविष्यात राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावात ही योजना राबवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झालेल्या या 'शिवभोजन थाळी'चा लाभ गरजूंना नक्कीच होणार आहे.
हेही वाचा - पालकमंत्री उदय सामंत घेणार 'जनता दरबार'
लोक कल्याणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच कार्यरत असतात. अशा लोक कल्याणकारी अनेक योजना मुख्यमंत्री भविष्यात राज्यात सुरू करतील आणि त्याचे उद्घाटन करण्याचा आनंद आम्हाला मिळत राहील. जिल्ह्यातील गरजूंनी या शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - सागरी क्षेत्रातील घुसखोरी रोखण्यासाठी जिल्ह्यात दाखल होणार हायस्पीड नौका