सिंधुदुर्ग - केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे जामसंडे येथे आगमन झाल्यानंतर देवगड शिवसेना कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी पहिल्यांदाच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
राणेंच्या ताफ्यासमोरच दिल्या घोषणा
नारायण राणेंचा सध्या सिंधुदुर्ग दौरा सुरु आहे. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम, माजी सभापती रविंद्र जोगल, संदेश पटेल, हर्षद गावडे, संतोष तारी व अन्य शिवसैनिक शिवसेनेचा झेंडा उंचावून शिवसेना जय घोषच्या घोषणा देत होते. यामुळे वातावरण चिघळण्यापूर्वी पोलीसांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. केंद्रीयमंत्री नारायण राणे जामसंडे वरुन देवगडकडे येत असताना शिवसैनिकांच्या घोषणाबाजीचा आवाज वाढल्याचेही दिसून येत होते. मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. मात्र शिवसेना कार्यालयावरती शिवसैनिकांची उपस्थिती व घोषणाबाजी ही लक्षवेधी ठरली होती.
कणकवलीत तापले होते वातावरण
शुक्रवारी राणेंची जनआशीर्वाद यात्रा ओम गणेश निवासस्थानी जोरदार घोषणा देत जात असतानाच शिवसेना शाखेकडूनही शिवसेना जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. शिवसेना शाखेत स्वतः आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे आणि जिल्ह्याभरातील शिवसैनिक सायंकाळी 7 वाजल्यापासून ठाण मांडून होते. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पूण राणेंची जनआशीर्वाद यात्रा नरडवे नाक्याच्या दिशेने येत होती. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि राणेंचे कार्यकर्ते पायी चालत राणेंच्या निवासस्थानी जात होते. नरडवे नाक्यावर राणेंची जनआशीर्वाद यात्रा येताच भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिकांडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडु नये याची पुरेपूर दक्षता पोलिसांनी आधीच घेतलेली असल्यामुळे दोन्हीकडचे लोकप्रतीनिधी आणि कार्यकर्ते आपापल्या मार्गाने निघून गेले आणि पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. असाच काहीसा प्रकार आज देवगडमध्ये घडला.