सिंधुदुर्ग - उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) सत्यशोधक जन आंदोलन सिंधुदुर्गच्या वतीने कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्स पाळत लोकशाही पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणा आणि क्रांतीगीतांनी महामार्ग दणाणून गेला होता.
उत्तर प्रदेशातील भूलगडी या गावात १४ सप्टेंबर रोजी घडलेली दलित मुलीवरील अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. ही घटना एकूणच भारतातील जातीव्यवस्था -पितृसत्ता आणि भांडवलशाही यांचे द्योतक आहे. याचा घटनाक्रम लक्षात घेता हे सिद्ध होते की, उत्तर प्रदेशातील सरकार व प्रशासन आणि सवर्ण लोकांंची अभद्र यूती ही अमानवीय घटना दाबून टाकण्यासाठी आणि आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल न करता पीडित मुलीकडे दुर्लक्ष करणे, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न मानता पीडित मुलीला वेगळ्याच दवाखान्यात दाखल करणे, पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे, तिच्या कुटुंबाला डांबून ठेवणे व इतरांशी संपर्क न करू देणे हा गुन्हा दाबून टाकण्याचा संतापजनक प्रयत्न असून लोकशाही मूल्यावरच अत्याचार करण्यासारखे आहे, असे सिंधुदुर्गतील सत्यशोधक जनआंदोलनाचे पदाधिकारी म्हणाले.
सत्यशोधक महिला आघाडीच्या पदाधिकारी अॅड. स्वाती तेली म्हणाल्या, 'त्या पीडित मुलीची जी विटंबना सरकारने केली ती अत्यंत निंदनीय आहे. तसेच या घटनेतील सर्व आरोपींवर अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे.' तर, सत्यशोधक जनआंदोलन पदाधिकारी महेश पेडणेकर म्हणाले, 'भाजपप्रणित राज्यात दलित लोकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हे अत्यंत वाईट आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. या घटनेकडे वेगळ्या पातळीवर पाहिले गेले पाहिजे. याबाबत जनतेच्या तीव्र भावनेचा विचार केला पाहिजे.'
यावेळी पीडिता व तिच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या. या प्रकरणाची न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करावी. घटनेचा एफआयआर घेण्यास हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबाला अंधारात ठेवून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा अमानवी व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यासंदर्भात, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - भारतीय टपालाच्या नवीन पोस्टकार्डवर झळकली सावंतवाडीची लाकडी खेळणी