सिंधुदुर्ग - नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सोमवारी (दि.३०सप्टेंबर)ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे नारायण राणे यांना जिल्ह्यात धक्का बसल्याचे चित्र आहे.
गेले काही महिने मला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील महत्त्वाच्या निर्णयात डावलले जात असल्यची खंत सावंत यांनी बोलून दाखवली. तसेच नितेश राणे यांनी, 'तुम्ही माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ का करता', असे विचारल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सावंत हे नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असून मला कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्यास सांगण्यात आले. या सर्व प्रकाराला कंटाळून मी राणे यांच्यापासून फारकत घेत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच राजीनामा पाठवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा महायुती अधांतरी; राणे वेटिंगवर, मुख्यमंत्री म्हणतात वाट पाहा
सावंत स्वत:ची राजकीय भूमिका आठ ते दहा दिवसात निश्चित करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वाभिमान संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी त्यांच्या समर्थकांसह नारायण राणे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. या पाठोपाठ राणे यांचे विश्वासू समर्थक असलेल्या सतीश सावंत यांनी देखील त्यांची साथ सोडली आहे.
हेही वाचा राणे 'वेटिंग'वरच राहतील; गृहराज्यमंत्री दिपक केसरकरांचा टोला
सावंत हे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ राणेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांनी साथ सोडल्याने हा नारायण राणे यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे राणेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात स्वाभिमान संघटनेला गळती लागल्याचे चित्र आहे.