सिंधुदुर्ग - शासनाकडून वाळू व्यावसायिकांनी वाळूची वाहतूक करण्यासाठी तयार केलेले रॅम्प उद्ध्वस्त केले. मात्र, ती कारवाई केवळ दिखाऊपणाची आहे. ही कारवाई झाल्यानंतरही पुन्हा अवैध वाळू व्यवसाय सुरू झाले आहेत. याविरुद्ध मनसे उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली आहे. कणकवलीत मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वाळू तस्करांकडून कर चुकवेगिरी-
यावेळी पुढे बोलताना पर्शुराम उपरकर म्हणाले, अवैधपणे काढल्या जाणाऱ्या वाळूमुळे शासनाचा कर चुकवला जात आहे. आज कोरोनाच्या काळात शासनाला निधीच्या मदतीची गरज असताना वाळू व्यावसायिकांकडूनही जी करचुकवेगिरी केली जात आहे त्याकडे, आम्ही शासनाचे लक्ष वेधणार आहोत. त्याचप्रमाणे वाळू वाहतूक करणारे ट्रक अत्यंत वेगाने पळवले जातात. त्यातून जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांची दुरवस्था होत आहे, याकडेही शासनाचे लक्ष वेढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोव्यात विक्री, जिल्ह्याला फटका-
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळूचा जिल्ह्याच्या विकासाला काही उपयोग होत नाही. त्याउलट ही वाळू जिल्ह्याबाहेर गोव्यात विकली जात असून यातून वाळू व्यावसायिक मोठे होत आहेत. मात्र शासनाचा कर चुकवला जात आहे. याकडे आम्ही लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जे रस्ते वाळू व्यावसायिक लोकांच्या ट्रक, डंपर वाहतुकीमुळे खराब झाले आहेत ते रस्ते शासनाच्या खनिकर्म विभागाच्या करातून केले जावेत, अशी आमची मागणी असल्याचेही उपरकर यावेळी म्हणाले.
मंत्र्यांचाही करणार निषेध
जिल्ह्यात मंत्री येतात आणि अनेक आश्वासने देऊन जातात. प्रत्यक्षात कृती शून्य होते याबाबतही या आंदोलनातून जाब विचारला जाणार आहे. कारण जनतेची फसवणूक करण्याच काम हे मंत्री करताहेत असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले