सिंधुदुर्ग : उधार घेतलेले पैसे परत न केल्याने सोलापूर येथील एका व्यक्तीचा कारमध्ये आणत असताना झालेल्या मारहाणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात मृतदेह टाकायला गेलेल्या कराडमधील दोघांपैकी एकाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर हा बनाव उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेला व्यक्ती दरीत पडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे घाटीतील दोन मृत्यूंचे गूढ अखेर उकलले आहे.
आंबोली घाटात दरीत पडून तरुणाचा मृत्यू : याबाबत अधिक माहिती अशी, आंबोली घाटात खोल दरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरीत पडलेल्या तरुणाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना दोन मृतदेह सापडले. त्यामुळे दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस शोध घेत असताना त्यांना मृत तरुणाच्या मित्रावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. मृत तरुणाच्या मित्राने पोलिसांना माहिती दिली की, तो एकाचा खून करून मृतदेह दरीत टाकण्यासाठी आला होता. त्याच्या मित्राचा पाय घसरल्याने तो दरीत कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे घाटातील दोन मृतदेहांचे गूढ अखेर उकलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
बनाव त्यांच्याच जीवावर बेतला : कराड येथील एका वीट विक्रेत्याला मजूर पुरवतो असे सांगून एकाने दुसऱ्याकडून पैसे घेतले होते. मात्र, संबंधित व्यक्तीने मजूर दिले नसल्याने त्याच्यात वाद झाला होता. शिवाय पैसे परत न केल्याने त्यांना गाडीतच मारहाण करण्यात आली होती. मात्र मारहाण झालेल्या व्यक्तीचा गाडीतच मृत्यू झाला. त्यामुळे आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाट गाठला. दोघे सोमवारी रात्री आंबोलीजवळील मुख्य धबधब्याजवळ आले. मृतदेह खोल दरीत टाकण्यासाठी दोघे एका कड्यावर उभे राहिले. यावेळी एकाचा पाय घसरुन तो खोल दरीत पडला. त्यात त्याचाही जागीच मृत्यू झाला. त्यामुळे आरोपींनी रचलेला बनाव त्यांच्याच जीवावर बेतला आहे.
हेही वाचा - MLA Abu Azmi on Love Jihad : 'लव जिहाद'वरुन अबू आझमी यांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, उगाच...