'सिंधुदुर्गच्या किनारी भागात चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो' - जिल्हा प्रशासन
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने पूर्ण पावले उचलली आहेत. नागरिकांनी देखील सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या किनारी भागामध्ये चक्रीवादळाचा फटका बसू शकतो, हे लक्षात घेता किनारी भागातील जनतेने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी किनारी भागाचा दौरा करत या भागातील आपत्ती व्यवस्थापन स्थितीचा आढावा घेतला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज
चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण, देवगड या तालुक्यातील किनारी भागात बसू शकतो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने पूर्ण पावले उचलली आहेत. नागरिकांनी देखील सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन
यावेळी बोलताना तौत्के चक्रिवादळ जिल्ह्याच्या समुद्रात 16 मे रोजी दाखल होत आहे. रविवारी पहाटे 4 वाजता दाखल होणारे हे वादळ दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे 4 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी देले आहे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी हलवा, प्रशासनाकडून स्थलांतराची सूचना मिळल्यास त्याचे पालन करा, घर सोडून स्थलांतर करावे लागल्यास गॅस, वीज, पाणी कनेक्शन बंद करून घर सोडा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
'प्रशासनाला सहकार्य करावे'
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले की जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करताना वेळ पडल्यास स्थानिक नागरिक आणि पाळीव जनावरे त्यांचे विस्थापन करण्याची वेळ आली तर त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच हे चक्रीवादळ आपल्या किनार्यावरुन पुढे जाईपर्यंत प्रशासन ज्या-ज्या सूचना देईल त्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती सुधारली तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल'
हेही वाचा - VIDEO : केरळात तौक्ते चक्रीवादळाचा कहर; कासारगोड येथे दुमजली इमारत कोसळली