सिंधुदुर्ग – राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 मधील कणकवली ते झाराप या टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असून त्याअंतर्गत असणारा कणकवली शहरातील उड्डाणपूल 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. महामार्ग ठेकेदार कंपनीनेही त्याला होकार दिला आहे. महामार्ग कामांची आढावा बैठक आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवती बँकेचे चेअरमन सतीश सावंत, कणकवली प्रांताधिकारी वैशााली राजमाने, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी रमेश पवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता बी.एस.पोवार, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रकाश भीसे, दिलीप बिल्डकॉनचे प्रकल्प अधिकारी के. के. गौतम, संजय पडते, संदेश पारकर उपस्थित होते.
कणकवलीतील उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वास आले असल्याने यापुलावरील स्ट्रिट लाईट तातडीने सुरू कराव्यात तसेच महामार्गालगतचे सर्व्हिस रोड तातडीने सुरू करावेत. या सर्व्हिस रोडसाठी ज्या ठिकाणी जमीन संपादन करणे बाकी आहे. त्याठिकाणी भूमी अभिलेख खात्याने तातडीने मोजणी करावी व जमीन अधिग्रहित करावी. या मोजणीसाठी नॅशनल हायवे अथॉरिटीने 30 हजार रुपये प्रशासनाकडे जमा केले असल्याने याबाबतची कार्यवाही तातडीने व्हावी, असे सामंत म्हणाले. शहरी भागामध्ये 45 मीटर व ग्रामीण भागात 60 मीटर रस्त्याची हद्द निश्चित करण्यात यावी. महामार्गालगतच्या ज्या इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यांचा मोबदला त्यांना मिळाला आहे. ज्या इमारती अर्धवट पाडण्यात आल्या आहेत त्या ताब्यात घेऊन तातडीने पाडण्यात याव्यात.
महामार्गावर पंचायत समिती लगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी संरक्षक कठडे बांधावेत व बॅरिकेडींग करण्यात यावे. महामार्गालगत कणकवली ते झारापदरम्यान दिलीप बिल्डकॉमने एस.टी बस थांबे तातडीने उभे करावेत. त्याचबरोबर पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे महामार्गालगतची गटारांची काम दर्जेदार करावीत. पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा होईल याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. कणकवली उड्डाण पुलाच्या ठिकाणी योग्य सर्व्हे करुन दिलीप बिल्डकॉनने आपल्या राखीव निधीमधून शौचालय उभारावे. या सर्व कामाकडे बांधकाम विभागाने लक्ष घालून संबंधित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.