सातारा - वाढदिवसानिमित्त कोयत्याने केक कापून त्यांनी स्टाईल केली खरी, परंतू तीच त्यांच्या अंगलट आली. शाहूपुरी पोलिसांनी 'बड्डे बॉय'सह दहशत पसरवणाऱ्या 5 जणांच्या टोळीस जेरबंद करत तलवार व कोयते जप्त केले. आदिल अस्लम शेख (वय -२६), शादाब अय्याज पालकर (वय -२०), मिजान निसार चौधरी (वय -३०), तोसिफ अजिज कलाल (वय -२६) व शादाब अस्लम शेख (वय -२५) यांना अटक केली आहे. त्यांचा सहावा साथीदार समीर अस्लम शेख फरार आहे. हे सर्व युवक मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीत राहणारे आहेत.
दस्तगीर कॉलनीत आदिल शेख याच्या वाढदिवसाला कोयत्याने केक कापून दहशत पसरवली गेली. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या होत्या.
मंगळवारपेठ, दस्तगीर कॉलनीमध्ये राहणारा एक बर्थ डे बॉय व त्याच्या इतर साथीदारांनी कोयते व तलवारी अशा घातक शस्त्रांचा बेकायदा शस्त्र साठा केला आहे. बर्थ डे बॉयने १० जून रोजी वाढदिवसानिमित्त साथीदारांसह कोयत्याने केक कापून दहशत केली आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दस्तगीर कॉलनीत छापा टाकून संशयितांना अटक केली. तसेच ४ मोठे कोयते व १ तलवार असा घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर , हवालदार हसन तडवी , लैलेश फडतरे , अमित माने , स्वप्निल कुंभार, ओंकार यादव , मोहन पवार , पंकज मोहिते , राहुल चव्हाण व सुमीर मोरे यांनी केली.