कराड (सातारा) - प्रेमसंबंधातून महिलेसह दोन वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना कराडजवळच्या वारुंजी गावात घडली आहे. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या हत्येचा प्रकार समोर आला. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झाले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आता या हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.
विराज हा मृत महिलेच्या बहिणीचा मुलगा-
सुशीला हिचा दहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. सुशीला ही वारूंजी फाट्यावरील प्यासा ढाब्यावर कामाला होती. त्याठिकाणी कामाला असणार्या अरविंद सुरवसे बरोबर तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, सुशीला आणि विराज हे दोघेही अचानक बेपत्ता झाल्याने विराजची आज्जी सोनवले यांनी 21 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी नातू विराज याला सुशीला आणि अरविंद यांनी पळवून नेल्याचा आरोप केला होता.
खून करून संशयित फरार-
मुलाच्या अपहरणाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत असताना वारूंजी गावातील लक्ष्मी कॉलनीत राहणार्या अरविंद सुरवसे याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारीच राहणाार्या सुनिता कांबळे यांनी सुरवसेच्या खोलीचे कुलूप तोडून पाहिले. त्यावेळी सुशीला आणि विराज यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. संशयित आरोपीने खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना देण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
जया सोनवले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताच्या तपासासाठी पथके रवाना केली आहेत. कराडचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारूती सराटे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.