ETV Bharat / state

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यावर माहुली येथे अंत्यसंस्कार - senior actor ashalata wabgaonkar funeral

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यावर साताऱ्यातील माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 'माझी आई काळूबाई' या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान, आशालता यांना कोरोनाची लागण झाली.

senior actoress ashalata wabgaonkar
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर
author img

By

Published : Sep 23, 2020, 1:17 AM IST

Updated : Sep 23, 2020, 6:12 AM IST

सातारा - ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यावर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी पहाटे ४.४५ वाजता साताऱ्याच्या प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या 79 वर्षांच्या होत्या.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यावर माहुली येथे अंत्यसंस्कार

तब्बल तीन दशके आम्हा मायलेकींचा अगदी घट्ट जिव्हाळा होता. या जिव्हाळ्याच्या आठवणी सांगताना अभिनेत्री अलका कुबल यांना हुंदका फुटला. 'माझी आई काळूबाई' या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान, आशालता यांना कोरोनाची लागण झाली. मंगळवारी पहाटे त्यांच्या निधनाची बातमी आल्याने अश्रू अनावर झालेल्या अलका कुबल यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. दुपारी कैलास स्मशानभूमी अंत्यसंस्कारावेळी याच मालिकेतील चित्रपट अभिनेत्री अलका कुबल आणि त्यांचे पती समीर आठल्ये, पालिकेचे आरोग्यप्रमुख सुहास पवार, आनंद कदम उपस्थित होते. दरम्यान, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी अलका कुबल यांच्याकडे सांत्वन पत्र दिले. अंत्यसंस्कारानंतर अलका कुबल तातडीने मुंबईला परतल्या.

आशालतांच्या नाट्य, चित्रपट आणि गायन कारकीर्दीवर एक नजर...

आशालता वाबगावकर यांच्या अभिनय कारकीर्दीतील त्यांचे 'मत्स्यगंधा' हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाट्यपदे गाजली. ही नाट्यपदे आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाट्यसंगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले. नाटकातील ‘सत्यवती’च्या (मत्स्यगंधा) भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्य पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध छटा यातून सादर करायच्या होत्या. ते आव्हान आशालतांनी लीलया पेलले होते.

बिर्ला मातोश्री सभागृहात १ मे १९६४ रोजी नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. संगीत आणि नाट्यपदे हा या नाटकाचा मूळ आत्मा. पुढे काही प्रयोगांनंतर ते नाटक अधिक आटोपशीर व कमी करण्यात आले. या नाटकाने त्यांना खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. म्हणूनच आजवरच्या अभिनय प्रवासात हे नाटक त्यांना महत्त्वाचे वाटते.

‘मत्स्यगंधा’ च्या यशानंतर आशालता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटक पूर्णवेळ करायचे, असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाट्यसंस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्येही त्या होत्या. ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ आणि अन्य शंभर मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत.

त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात दरवर्षी ही आरती वाजविली जाते. ‘एचएमव्ही’ कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढली. 'चांद भरली रात आहे’, ‘चांदण्यांची रोषणाई मी कधी ना पाहते’, ‘राजसा राजकुमारा’ (नाटक-विदूषक, तीनही गाण्यांचे संगीतकार श्रीनिवास खळे), ‘जन्म दिला मज त्यांनी’, ‘तव भास अंतरा झाला मन रमता मोहना’ (मत्स्यगंधा), ‘रवी किरणांची झारी घेऊनी’ (भावगीत) ही त्यांनी गायलेली अन्य काही गाणी.

Last Updated : Sep 23, 2020, 6:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.