सातारा - जिल्हा नागरी दलित वस्ती योजने अंतर्गत सातारा नगरपरिषदेला सव्वाआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून साताऱ्याच्या हद्दवाढ झालेल्या भागासह, विविध ठिकाणच्या दलित वस्त्यांमध्ये विविध प्रकारचे रस्ते, गटर्स, संरक्षक भिंत आदी मुलभुत विकास कामे लवकरच हाती घेवून पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
मुलभुत सुविधा देण्यावर भर -
जिल्हास्तरावरील जिल्हा नागरी दलित वस्ती योजनेमधुन सातारा नगरपरिषदेस मोठा निधी मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात होते. सातत्याच्या पाठपुरावा आणि जिल्हयाचे पालक मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा मोठा निधी नगरपरिषदेला मिळाला आहे. वाढीव हद्दीसह सातारा शहरात मागासवर्गीय दलित वस्त्या आहेत. तेथे मुलभुत सुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातुन ५ टक्के राखीव निधीसह सर्वसाधारण निधी विनियोगात आणुन अनेक कामे मार्गी यापूर्वीच लावली आहेत.
लवकरच विकासकामे हाती घेणार -
उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हास्तरीय जिल्हा नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होण्यासाठी आम्ही जाणिवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे एकाच वेळी सुमारे सव्वाआठ कोटींचा निधी नगरपरिषदेला मिळालेला आहे. नागरी दलित वस्त्यांचा विकास झाला पाहीजे या भावनेतुन यापूर्वी आमच्या स्थानिक विकास निधीमधुन संपूर्ण जिल्हयातील महत्वाच्या व आवश्यक त्या ठिकाणी विविध विकास कामे उभारलेली आहेत. लवकरच सातारा शहरातील वाढीव भागासह दलित/मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मंजूर झालेल्या सव्वाआठ कोटींमधुन उपयुक्त कामे विहित पध्दतीने हाती घेण्यात येवून कार्यान्वित करण्यात येतील असेही उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.