सातारा - बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये साजऱ्या होणाऱ्या विजय दिवस सोहळ्याचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त विजय दिवसाच्या मुख्य सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तीन दिवस भरगच्च कार्यक्रम - कर्नल संभाजी पाटील यांच्या संकल्पने गेली २४ वर्षे कराडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे. यंदा सोहळ्याचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत शाळा, महाविद्यालयांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. रात्री टाऊन हॉलमध्ये स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होईल. १४ डिसेंबरला सकाळी प्रीतिसंगम बागेत चित्रकला स्पर्धा होईल. त्यानंतर रक्तदान शिबीर आणि दुपारी सातारा, सांगली जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमातांचे संमेलन होईल.
शहीदांच्या कुटुंबियांचा होणार सन्मान - विजय दिवसाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त यंदा शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपित्यांचा सन्मान केला जाणार आहे. १५ डिसेंबरला सकाळी साडे आठ वाजता एकत्मता दौड होईल. सायंकाळी जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे वितरण होईल. या कार्यक्रमात साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांचाही सन्मान केला जाणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी स्टेडियमवर दि. १६ डिसेंबरला होणारा विजय दिवसाचा रौप्यमहोत्सवी सोहळा यंदाचे खास आकर्षण आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्य सोहळ्यात चित्तथरारक हवाई कसरती पाहायला मिळणार आहेत. Conclusion: