सातारा - राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ पाण्याखाली गेले आहे. कराडच्या प्रीतीसंगमावर कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे समाधी स्थळ पाण्याखाली गेले आहे. 2004 साली सुध्दा असाच पाऊस झाला होता. त्यावेळी देखील याठिकाणी पावसाचे पाणी आले होते. प्रशासनाने त्यावेळी या ठिकाणी भिंत बांधली होती. मात्र, या भिंतीवरून पाणी वर आले आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. सुमारे एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. कोयना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. नदीपात्रातील पाणी अनेक ठिकाणी मानवी वस्तीत तसेच कोयनानगर, कराडच्या रस्त्यावर आले आहे.
अनेक ठिकाणी पाण्याचा वेढा पडल्याने नागरिक घरातच अडकून पडले आहेत. पाटण शहरात जुने आणि नवीन बस स्थानक परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे कराडहून कोयनानगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या परिसरात तीन ते चार फूटापर्यंत पाणी साचले असल्याने ये-जा करणे सध्या तरी या शक्य होत नाही. पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती किती काळ राहील, याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.