कराड (सातारा) - 2 हजारांची लाच स्वीकारणार्या तलाठ्यासह त्याच्या खासगी सहाय्यकास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कराड तालुक्यातील मसूर येथे ही कारवाई झाली. नीलेश सुरेश प्रभुणे (रा. मलकापूर, कराड) आणि रविकिरण अशोक वाघमारे (रा. मसूर, ता. कराड), अशी त्यांची नावे आहेत.
सापळा रचून कारवाई
मसूर (ता. कराड) येथील तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे असलेल्या जमिनीचा सातबारा उतारा आणि सर्च रिपोर्ट देण्यासाठी तलाठ्याने आपल्या सहाय्यकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी मंगळवारी खात्री केली होती. त्यानंतर बुधवारी सापळा रचून 2 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह त्याच्या खासगी सहाय्यकास रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी कराड तहसील कार्यालयातील गोडाऊन किपरला कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे कराड तालुक्यातील महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. तसेच सामान्यांना महसूल कर्मचार्यांकडून नाडले जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.