सातारा - भाजपने शपथविधी उरकला असला, तरी विश्वासदर्शक ठरावावेळी सर्व काही स्पष्ट होईल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीचेच सरकार सत्तेवर येईल, असे सूचक संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिले. सोमवारी कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सत्तेचा गैरवापर करून हवे तसे निर्णय भाजपने घेतले आहेत. मात्र, बहुमत सिद्ध करताना योग्य ते चित्र स्पष्ट होईल. अजित पवार यांनी बंड का केले याची आपल्याला माहिती नाही आणि त्यांच्या बंडामागे आपला हात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसोबत संपर्क केला असेल तर माहिती. मात्र, मी व्यक्तिश: अजित पवारांशी संपर्क केलेला नाही, असेही ते म्हणाले.
शपथविधीनंतर पदभार स्वीकारणे हा शिष्टाचार आहे. त्यात वेगळे असे काहीच नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची निवड वैध आहे का? हा खरा प्रश्न आहे. त्याबाबत न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याने त्यावर मी भाष्य करणार नाही, असे ते म्हणाले.
सध्या जी अनेक संकट निर्माण झाली आहेत. त्यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यात सध्या जी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत किमान समान कार्यक्रम घेऊन सरकार चालवणे गरजेचे आहे. तरच ते सरकार टिकेल. याचा अनुभव आम्हाला आहे. 2004 साली अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडीससारखे लोक होते. जे जन्मभर भाजपच्या विरोधात वागले. ममता बॅनर्जींसारखे अनेक लोक होते. मात्र, वाजपेयींनी भाजपचा वादग्रस्त अजेंडा बाजू ठेऊन किमान समान कार्यक्रम जाहीर करून ५ वर्षे कारभार केला.
तीन पक्ष एकत्र येतात त्यावेळी त्यांचे विचार सारखे असतीलच असे नाही. त्यामुळे पटत नसलेले विचार बाजूला सारत राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे मुद्दे घेऊन राज्य पुढ चालवायचे असते. त्यासाठीच आम्ही तिन्ही पक्षांनी चर्चा केली. त्यासाठी ३ ते ४ दिवस लागले. मात्र, विलंब लागला तरी चालेल पण पूर्ण विचारानेच निर्णय घेतला पाहिजे, असे पवार म्हणाले.