सातारा - जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे गेल्या दोन दिवसांत ३ बळी गेले. त्यामुळे या आजाराने बळींची संख्या आता 11 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात 14 वर्षांखालील सुमारे 2 हजार 300 कोरोना बाधित बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
म्युकर मायकोसिसच्या 83 रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात कोविड पश्चात उद्भवणाऱ्या म्युकर मायकोसिसच्या आजाराने बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये तसेच डायबेटीक्स रुग्णांमध्ये हा म्युकर मायकोसिस आजार तत्काळ बळावत आहे. या आजाराबाबत काही रुग्णांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे 83 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 24 रुग्ण उपचार घेत आहेत, तर उर्वरित इतर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 11बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 10 रुग्ण म्युकर मायकोसिसवर मात करत घरी सुखरूप परतले आहेत.
अँँम्प्युटरेझेशन बी इंजेक्शनचा तुटवडा
म्युकर मायकोसिस हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी 1 रुग्णास सकाळी, दुपारी व सायंकाळी प्रत्येकी 2 अशी 6 इंजेक्शनची गरज आहे. जिल्हा रुग्णालयात व इतर ठिकाणची अशी एकूण 83 रुग्णसंख्या विचारात घेतली, तर त्यासाठी 400 ते 425 अँँम्प्युटरेझेशन बी या इंजेक्शनची आवश्यकता आहे. पण सद्यस्थितीत 150 ते 200 च इंजेक्शन येत आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणे अवघड होत असल्याचे समजते. प्रस्तावित बेड तसेच अँँम्प्युटरेझेशन बी इंजेक्शनसाठी आरोग्य उपसंचालकांकडे मागणी करण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
4 हजार 923 बालकांना कोरोना
दरम्यान, लहान मुलांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असून मे महिन्याअखेर जिल्ह्यात 0 ते 14 वयोगटातील 4 हजार 931 बालकांना कोरोनाची लागण झाली. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात रोजच्या ओपीडी मध्ये 3 ते 4 कोरोनाची लागण झालेली बालकं आढळून येत आहेत. सुदैवाने गंभीर आजारी असलेले 1 ही बालक आढळून आले नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगीतले.
हेही वाचा-राज्यात गुरुवारी 15 हजार 229 नवे कोरोनाबाधित; 25 हजार 617 कोरोनामुक्त