कराड (सातारा) - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील रेशनकार्ड नसणाऱ्या आणि मजुरी करणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार आहे. या संदर्भात बँकेच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील तहसीलदारांकडून गरजूंची गावनिहाय यादी बँकेला ई-मेलवर मिळावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
सध्या कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. लॉकडाऊन आणि संचार, जमावबंदीमुळे सर्व काही ठप्प आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरीत तसेच शेतमजुरांच्या पोटापाण्याचे हाल सुरू आहेत. अशा परिस्थितीत काळात जिल्हा बँक गरजूंच्या मदतीसाठी सरसावली आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 87 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू ; रुग्णांची एकूण संख्या 2509
रेशन कार्ड नसणाऱ्या स्थलांतरीत आणि शेतमजुरांची गावनिहाय यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेला ई-मेलवर उपलब्ध करून द्यावी, असे पत्र बँकेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यादी मिळाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक संबंधितांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार असल्याचे बँकेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.