सातारा- नागरिकत्व सुधारणा आणि नागरिकत्व नोंदणी हे दोन्ही कायदे धर्मावर आधारीत असून ते भेदभाव करणारे कायदे आहेत. या कायद्यांमुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला धक्का पोहचत आहे. त्यामुळे, दोन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी कराडमधील सर्वधर्मीयांनी कराड तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरांनी 'एनआरसी हटाव, संविधान बचाव' अशा घोषणा दिल्या आणि मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले.
केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर मंजूर केले आहेत. परंतु, दोन्ही कायदे धर्मावर आधारीत भेदभाव करणारे आहेत. या कायद्यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला धक्का पोहचत आहे. त्यामुळे, सीएए आणि एनआरसी कायदे रद्द करावेत अशी मागणी मोर्चात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा मंगळवार पेठ, कन्याशाळामार्गे चावडी चौक होत मुख्य बाजारपेठेतून मोर्चा दत्त चौकातून कराड तहसील कार्यालयासमोर आला. त्यानंतर कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले. मोर्चामुळे कराड शहरातील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. मोर्चामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा- सहावीतल्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाला सक्तमजूरी