सातारा - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करत संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात लग्न असणाऱ्यांची लग्ने पुढे ढकलण्यात आली आहेत. कोरोनाची परिस्थिती केव्हा एकदा संपुष्टात येईल आणि आपल्या डोक्यावर केव्हाशी एकदा अक्षता पडतील याची उत्सुकता अनेक जोडप्यांना लागल्याची दिसून येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. यामुळे मे महिनासुध्दा आपल्या हातून जाणार या भीतीने वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्यांची चांगलीच निराशा झाली आहे. परिणामी लग्नाच्या मुहूर्तही लांबणीवर पडण्याची भिती असल्याने यंदा कर्तव्य करण्याचा तयारीत असणाऱ्यांची चिंता सतावत आहे.
फेब्रुवारी ते मे महिन्यात लग्नसराईचे दिवस असतात. यंदा डिसेंबरमध्ये चीनमध्ये पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. विदेशातून आलेल्या नागरिकांमुळे देशात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन सारख्या उपाययोजना करण्यात आल्या. मार्च महिन्यात लग्न तिथी काढलेल्या वधू आणि वरांचे लग्न ठरलेल्या दिवशी झाली नाहीत. गर्दीतून कोरोना पसरण्याची भीती असल्याने अनेकांनी स्वत:हून पुढे ढकलण्याचाही निर्णय घेतला. तर ज्यांनी तशाच परिस्थितीमध्ये लग्न करायचा निर्णय घेतला, त्यांच्यावर संबंधित विभागाने संचारबंदी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले.
हेही वाचा - खनिज तेलाच्या दराला 'टाळेबंदी'; प्रति बॅरल केवळ १५ डॉलरचा दर !
मे महिन्यात लग्न तारीख काढणे अवघड असल्याने अनेकांनी जून-जुलै महिन्यातील तारखा निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरोना व्हायरसचा फैलाव आटोक्यात आला तरच जून-जुलै महिन्यात किमान पाहुणे-रावळ्यांत तरी लग्न होईल, याची आशा वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्यांना आहे. मात्र, ही अपेक्षा पूर्ण होईल की नाही, याची मात्र कोणालाच खात्री नसल्याचे दिसून येत आहे. ३ मेनंतर जरी लॉकडाऊन उठले तरी सार्वजनिक कार्यक्रमांना शासन दोन ते तीन महिने परवानगी देण्याची शक्यता फारच कमी आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी बहुतांश नागरिक स्वत:हून गर्दीची ठिकाणे टाळत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन उठल्यावर जरी लग्न काढले तरी लग्नासाठी किती पाहुणे उपस्थित राहतील, याचा अंदाज करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत 'यंदा कर्तव्य आहे' अशा जोडप्यांना सध्या तरी थोडा संयम ठेवल्याशिवाय कोणताच पर्याय नाही.