सातारा - सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांच्यावरील बोचऱ्या टिकेनंतर दोघेही एका खासगी कार्यक्रमात खांद्याला खांदा लावून बसल्याचे पहायला मिळाले. तर रात्री उशिरा कोरेगावजवळील सभेत 'मी कोणाला आव्हान देत नाही, आणि दिले तर कमीपण पडणार नाही' असे वक्तव्य आमदार शिंदे यांनी केले.
गेल्या ४-५ दिवसात आमदार भोसले व आमदार शिंदे यांच्यातील राजकीय कोलांट्या उड्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय पटलांवर चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या आठवड्यात शिवेंद्रसिंहराजे यांनी कुडाळ (ता. जावळी) येथील जाहीर कार्यक्रमात शशिकांत शिंदे यांना खडेबोल सुनावले होते.
काय म्हणाले होते शिवेंद्रसिंहराजे ?
मी कुरघोड्या करत नाही, समोरासमोर दोन हात करण्याची माझी तयारी असते. पाठीत खंजीर खुपसत नाही. पण माझ्या वाटेला गेल्यास माझी वाट लागली तरी चालेल, माझे सर्व संपले तरी चालेल पण मी त्याचे सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही," अशा शब्दांत आमदार भोसले यांनी शशिकांत शिंदेवर बोचरी टिका केली होती. या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लढवले जात होते.
हेही वाचा - शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक बळकट; अमित शाहांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
खासगी कार्यक्रमात होते एकत्र -
काल (रविवारी) सातारा तालुक्यातील एका खासगी समारंभात दोन्ही आमदार खांद्याला खांदा लावून बसले होते. त्यावेळी पत्रकाराच्या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे यांनी 'मग आम्ही एकत्र येऊ नये का' असे भाष्य केल्याने दोघांत दिलजमाई झाल्याची चर्चा उठली.
पक्षासाठी काहीही करेन - शिंदे
रात्री उशिरा एकंबे (ता. कोरेगाव) येथील जाहीर सभेत शिवेंद्रसिंहराजे यांच्या टिकेच्या अनुषंगाने बोलताना आमदार शिंदे यांनी 'मी कोणालाही आव्हान देत नाही, मी एक साधा कार्यकर्ता आहे. पक्षासाठी जे जे आव्हान स्विकारावे लागेल, ते ते करण्याची ताकद माझ्यात असेल. कोणासमोरही ठामपणे उभे राहणारा शशिकांत शिंदे हा राष्ट्रवादीचा पाईक असेल" अशा शब्दात त्यांनी आपल्यावरील टिकेला प्रत्युत्तर दिले.
नूरा कुस्तीमुळे तर्कवितर्क -
गेल्या आठवडाभरातील या नूरा कुस्तीने जिल्ह्यात राजकीय तर्कांना चालना मिळाली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या टिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलले गेले असेल. अशा धमक्यांना घाबरण्याचे कारण नाही' अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती.