सातारा - साताऱ्यातील कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. आ. शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. हा मला टार्गेट करण्याचा प्रयत्न असून आगामी काळात मी त्यांचे घर फोडणार असल्याचा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
कदमांची वापसी, शिंदेंची एक्झिट - भाजपमध्ये गेलेले जावळीचे माजी आमदार जी. जी. कदम यांचे सुपुत्र अमित कदम हे मध्यंतरी भाजपला सोडचिट्टी देत स्वगृही परतल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली होती. असे असतानाच शिंदे गटाने ऋषिकांत शिंदे यांना शिवसेनेत घेऊन आमदार शशिकांत शिंदेंना तसेच राष्ट्रवादीला पुन्हा धक्का दिला आहे. आमदार शशिकांत शिंदे हे जावळीचे भूमिपुत्र आहेत. पुनर्रचनेत जावळी आणि सातारा हा एकच मतदार संघ झाला. त्यामुळे २००९ पासून शशिकांत शिंदे कोरेगावमधून निवडणूक लढवत आहेत.
राजकारण्यांच्या कुटुंबात फोडाफोडी - शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने अनेक राजकारण्यांच्या कुटुंबात फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, आगामी काळात मी त्यांचे घर फोडणार आहे. त्यातून त्यांना आगामी निवडणुकीत परिणाम दिसेल. माझे राजकिय करिअर उद्धवस्त करण्याचा शिंदे गटाचा डाव आहे. त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदेंनी दिली आहे.
दबावामुळे त्यांची अडचण झाली असेल -आमदार शिंदे म्हणाले की, आमचे बंधू व्यवसायिक आहेत. व्यवसाया आणि त्या संदर्भातील कामांच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकल्याने त्यांची अडचण झाली असेल. त्यातून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. या निर्णयामुळे माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही.
पैसे घेऊन बदल्या - जिल्ह्यात सध्या सोयीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे षडयंत्र सुरु आहे. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणच्या बदल्यांसाठी पैसे घेतले जात आहेत. येत्या काही दिवसांत हा प्रकार पुराव्यासह जाहीर करणार असल्याचा इशाराही आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे.
हेही वाचा -
- Bhaskar Jadhav on BJP : भाजप कोणाचा पक्ष? भास्कर जाधवांनी थेटच सांगितले...
- Bajaj Finserv project : बजाज फिनसर्व्हची पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक, राज्यात निर्माण होणार 40 हजार रोजगार-उपमुख्यमंत्री
- Ajit Pawar on OBC : भाजप जातनिहाय जनगणना टाळत आहे, ढोंगी लोकांचा पडदा पाडण्याचे काम राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले पाहिजे- अजित पवार