पाटण (सातारा) - सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी आपली आई व समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका सुहासिनी पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन शनिवारी पाटण नगरपंचायतीमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह शहरातील 100 गोरगरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.
समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 9 मार्चपासून आजपर्यंत पाटणसह परिसरातील तब्बल 500 च्यावर गोरगरीब कुटुंबाना नितीन पिसाळ यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात गरीब लोकांना त्यांनी मदतीचा हात दिल्याने लोकांमधूनही त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन नंतर खऱ्या अर्थाने पाटण शहरासह परिसरातील हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. काम नसल्याने रोजचे चलन बंद झाले. चलन बंद झाल्याने गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. अशावेळी शासनाची कसलीही वाट न पाहता सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी कर्तव्य भावनेने सामाजिक उत्तदायित्व स्वीकारून गोरगरीब कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला. आजपर्यंत त्यांनी समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल 500 च्या वर गोरगरीब कुटुंबाची भूक भागवली आहे.
आईच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. 25 रोजी त्यांनी पाटण नगरपंचायतीमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच शहरातील मोरेगल्ली, रामापूर, ब्राह्मणपूरी, सिद्धार्थ कॉलनी, भडकबाबा नगर अशा शहरातील विविध ठिकाणच्या 100 गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.