सातारा - जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाड तालुक्यानंतर वाई तालुक्यातील देवरुखकर वाडी या वस्तीमधील पाच ते सहा घरांवरही दरड कोसळली आहे. ही घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पाच रहिवाशी अडकले आहेत. देवरुखकर वाडी परिसरात 20 घरे आहेत. त्यातील पाच ते सहा घरे रहिवाशांसह ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. पंधरा लोकांना बाहेर काढण्यात यश आले. अद्याप मदतकार्य सुरू आहे.
हेही वाचा-Konkan Rain : यंत्रणांनी सतर्क राहून बचावकार्य करावे; पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
पाच ते सहा घरांवर कोसळली दरड -
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासन व आरोग्य व्यवस्था घटनास्थळी पोहोचली आहे. जेसीबीच्या माध्यमातून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. या घरातून बाहेर काढलेले तीन लोक अत्यवस्थ आहेत. त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात धोम धरणाच्या लगत देवरुखकर वाडी या वस्तीवर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. ही वस्ती 20 घरांची असून पाच ते सहा घरांवर दरड कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली वीसहून अधिक लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातील पंधरा लोकांना बाहेर काढण्यात यश आले.
हेही वाचा-कृष्णेच्या पाणी पातळीत एका दिवसात 14 फुटांनी वाढ, 35 फुटांपर्यंत वाढ होण्याची शक्यता
मदतकार्यात अडचणी
मदत कार्यासाठी प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे या परिसरातील वीज खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.
हेही वाचा-landslide at mahad महाडमध्ये कोसळली दरड; 400 ते 500 जण अकडल्याची भीती
घटनास्थळी यंत्रणा दाखल -
दरड कोसळल्याची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सर्व प्रशासन, आरोग्यव्यवस्था, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले आहेत. चार जेसीबीच्या माध्यमातून युद्धपातळीवर दरड बाजूला हटविण्याचे काम सुरू आहे. दरडीखालून काढलेल्यांपैकी तीन लोक अत्यवस्थ आहेत. त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा भाग दुर्गम असल्यामुळे आणि या मार्गावरील रस्ते व पूल मुसळधार पावसात वाहून गेल्यामुळे जागेवर पोहोचण्यात व मदतकार्यात अडचणी येत आहेत.