सातारा: मुख्यमंत्री शिंदे आपल्या मूळ गावी शेती पाहण्यासाठी आणि कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. ते सुट्टीवर नव्हते, असे रामदास आठवले म्हणाले. निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे. तसाच सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल मेरिटवर लागेल. सध्याची स्थिती पाहता 75 टक्के आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे आहेत. उध्दव ठाकरेंनी आमदारांची कामेच केली नाहीत. कोरोना काळात ते आमदारांना भेटलेही नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली असल्याचा टोला आठवलेंनी लगावला.
शिंदेंचे ते 'महाबंड': संजय राऊत यांच्या भूलथापांना बळी पडून उध्दव ठाकरे महाआघाडीत गेल्याचे सांगत आठवले म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. परंतु, त्याप्रमाणात मते मिळत नव्हती. शिवसेनेत आतापर्यंत अनेकवेळा बंड झाले; मात्र ते तेवढ्यापुरते मर्यादित होते. एकनाथ शिंदे यांचे बंड हे 'महाबंड' आहे.
राज ठाकरेंची आवश्यकता नाही: मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास विरोध का? असा प्रश्न माध्यमांनी केला असता स्वतंत्र राहिल्यावर त्यांना भाषण करण्याची संधी मिळते. ते त्यांच्याच फायद्याचे आहे, असा खोचक टोला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला. आम्हाला त्यांची आवश्यकता नाही. माझा पक्ष युतीत असताना ते नकोत, या भूमिकेचाही त्यांनी पुनरूच्चार केला.
नागालँडचे आमदार अधिवेशनाला: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिवेशन 28 मे रोजी शिर्डी येथे होणार आहे. अधिवेशनाला देशातून 50 हजार कार्यकर्ते येतील, असे नियोजन केल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच नागालँडमधील रिपाइंचे दोन आमदारही सहभागी होणार आहेत. देशात पक्ष वाढीवर भर देण्याची पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आठवलेंनी ठाकरेंना डिवचले: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डिवचले आहे. राज यांच्या फक्त सभेला गर्दी होते. मात्र, त्यांना मतदान होत नाही. तसेच, त्यांनी कितीही विश्वास व्यक्त केला असला तरी त्यांना मुंबई महापालिकेत चार-पाच जागांच्या पलिकडे काही जागा मिळणार नाहीत असा टोलाही आठवलेंनी गेल्या मार्च महिन्यात लगावला होता. ते शिर्डीत प्रसारमांध्यमांशी बोलत होते.