सातारा: गडकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. गडकिल्ल्यांचा इतिहास आणि पावित्र्य जपण्यासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात केली आहे. तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 25 कोटींचा निधी वर्ग करण्याची सूचनाही पर्यटन मंत्र्यांना केली आहे. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे उपस्थित होते.
अतिक्रमण हटविणार: मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे जतन, संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी निधी कमी पडणार नाही. तसेच गड किल्ल्यांवर अतिक्रमणे असल्यास लवकरच ती काढली जातील. शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी असून त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. सण, उत्सव ही आपली परंपरा, संस्कृती आहे. राज्यात परिवर्तन घडल्यामुळे आज प्रतापगडावर एवढा उत्साह पाहायला मिळतोय. परिवर्तन झाले नसते, तर एवढा उत्साह पाहायला मिळाला असता का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
सोहळा न भुतो न भविष्यती: राज्यातील सत्ता परिवर्तन असेल अथवा आजचा शिवप्रतापद दिनाचा भव्य सोहळा असेल, या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने घडल्या आहेत. त्यांना वंदन करण्याचे भाग्य मला लाभले. आजचा शिवप्रताप दिन सोहळा न भुतो न भविष्यती, असा साजरा झाला. तो सर्वांच्या कायम स्मरणात राहिल. राज्यातील साडे बारा कोटी जनतेच्यावतीने मी छत्रपती शिवरायांना वंदन करतो. या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या मनात ज्या भावना होत्या. त्या पूर्ण करण्याचे काम सरकारने केले. अशाच चांगल्या भावना आपल्या मनामध्ये आणा. सरकार त्या पूर्ण करेल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींना दिला आहे.
विकास हाच अजेंडा: आयोध्येत राममंदीर बांधण्याचे दिवंगत बाळसाहेबांचे स्वप्न होते. ते केंद्र सरकारने पूर्ण करत आहे. काश्मिरमधून 370 कलम हटविण्याचे काम अमित शाहांनी केले. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार्यांबरोबर आम्ही युती केली. छ. शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आमचा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही. राज्यातील प्रत्येक घटकांचा विकास करून त्यांच्या प्रश्नांना न्याय देणे, हाच आमचा अजेंडा आहे. लोकांना न्याय देणारे सरकार आम्ही स्थापन केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
हेलिकॉप्टर वरुन सवाल : मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या भागातील शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत प्रगती करणानाचे चित्र मला कराडमध्ये पाहायला मिळाले. मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे. पण, काही जण म्हणतात, मी शेती करायला हेलिकॉप्टरने जातो. शेतकरी कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री होऊ नये का ? शेतकर्याचा मुलगा हेलिकॉप्टरने फिरू नये का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.