कराड (सातारा) - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्री वादळाची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. शिंदे, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, मलकापूरच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या समवेत बैठक घेतली.
अरबी समुद्रावर चक्री वादळ घोंगावत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. रविवारी (दि. 31मे) वादळी पावसाने जिल्ह्यात नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सुचना पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
हेही वाचा - सातारा : सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, जिल्ह्यात मोठया प्रमाणात नुकसान
हेही वाचा - साताऱ्यात 'हे' व्यवसाय पुन्हा होणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित आदेश