सातारा - पुणे व सातारा जिल्ह्यात खून, खंडणी, मारामारी, अपहरण, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांत सहभाग असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 9 जणांच्या टोळीला तडीपार करण्यात आले. या टोळीला सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
हेही वाचा - जंगली रानडुक्कराची शिकार करणाऱ्या ५ युवकांना वनाधिकाऱ्यांनी केली अटक
याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज दिले. सोमनाथ रमेश चव्हाण (31 रा. कालगाव ता. कराड) हा या टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यासह त्याचे साथीदार किरण जगन्नाथ किरतकर (वय 25), सागर गोरख घाडगे (वय- 25 दोघेही रा.मसुर, ता.कराड) मयूर महादेव साळुंखे (वय 28) गोल्डन उर्फ सुशील दत्तात्रय वारे (वय-22) सुजित बाळासाहेब फाटक (वय-19) सुमित दीपक शिंदे (वय-22) वैभव उत्तम चव्हाण (वय-23 सर्व रा.कालगाव ता.कराड) व शुभम दत्तात्रय गायकवाड (वय-२०, रा.नांदगाव, ता. सातारा) अशा 9 जणांना तडीपार करण्यात आले आहे.
हेही वाचा - वर्षभरापूर्वीच्या खुनाची तरुणांनी दिली कबुली
या टोळीने सातारा व पुणे जिल्हयात खून व बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी, अपहरण, मोठी दुखापत, गर्दी-मारामारी, शिवीगाळ-दमदाटी, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे या टोळीच्या नावावर नोंद आहेत. सोमनाथ रमेश चव्हाण ही टोळी चालवतो. या टोळीवर वेळोवेळी कारवाई करुनही त्यांची गुन्हे करण्याची वृत्ती बदलली नाही. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. त्यामुळे त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव उंब्रज पोलिसांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. या टोळीस तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये सातारा, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे.