सातारा - कराडमधील कुख्यात गुंडाचा खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अनिकेत रमेश शेलार (रा. शास्त्रीनगर-मलकापूर, ता. कराड), इंद्रजित हणमंतराव पवार (रा. लाहोटीनगर-मलकापूर, ता. कराड), सुदर्शन हणमंत चोरगे (रा. कोयना वसाहत, कराड), आशिष अशोक पाडळकर (रा. मलकापूर, ता. कराड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.
कराडमधील कुख्यात गुंड अभिनंदन झेंडे याचा खून करण्याच्या उद्देशाने चौघेजण सिल्व्हर रंगाच्या पोलो गाडीतून आले होते. शाहू चौकातील एका केशकर्तनालयातून गुंड अभिनंदन झेंडे बाहेर येताच आरोपींनी कोयता आणि विळ्याने त्याच्यावर हल्ला केला. कोयत्याचा वार चुकवून झेंडे हा केशकर्तनालयात घुसला. दुकानाची आतून कडी लावून त्याने कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना फोन करून हल्ल्याबाबत माहीती दिली. विजय गोडसे व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांना पोलिसांनी घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार नितीन येळवे, देवा खाडे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, चव्हाण, होमगार्ड अमोल जंगम, अक्षय निकम, गणेश खुडे, चंद्रशेखर म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, कराड शहरात होणाऱ्या गुन्हेगारी हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून कोणाचीही गुंडगिरी चालू देणार नाही, असा इशारा पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी दिला आहे. गुंड प्रवृत्तींच्या लोकांना तडीपार करण्यात येणार असल्याचेही गुरव यांनी सांगितले.