कराड (सातारा) - जिल्ह्यातील आठ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यात म्हासोली (ता. कराड) गावातील पाच, खंडाळा तालुक्यातील एक आणि खटाव तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 146 झाली असून कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांनी शंभरी पार (101) केली आहे.
उंडाळे विभागातील म्हसोली गावात एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मंगळवारी आणखी पाच कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिला रुग्णांचा समावेश आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव, कराड तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, येवती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेने म्हासोली गावात तळ ठोकला आहे.
आरोग्य विभागाने वैद्यकीय तपासणीसह अन्य उपाययोजना सुरू केल्या आहेत. कराड तालुक्यात बाधितांची संख्या वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
10 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 32 जण विलगीकरणात
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील विलगीकरण कक्षात 32 जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.