सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रामध्ये वन्यजीव विभागाची फायबर बोटी जाळून नष्ट करून साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी पूर्वाश्रमीच्या वन मजुराला अटक केली. कामावरून कमी केल्याच्या रागातून त्याने हा प्रकार केला असल्याचे समजते.
रोजंदारी तत्त्वावर केले काम
अविनाश गोविंद जाधव (रा. आकल्पे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. त्याने काही महिने वन्यजीव विभागात रोजंदारी तत्त्वावर वनमजूर म्हणून काम केले आहे. सध्या तो कामवर नव्हता. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात कर्मचाऱ्यांना गस्तीसाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी संरक्षक कुटी उभारण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या म्हाळुंगे नियतक्षेत्रात म्हाळुंगेवाडी येथे असलेल्या संरक्षक कुटीमधील साहित्याची अज्ञाताने मोडतोड केली असल्याचा प्रकार निदर्शनास आला. तसेच काही साहित्याची चोरी झाली असल्याचेही लक्षात आले.
छिद्र पाडून बोटीचे नुकसान
चोरट्याने वन्यजीव विभागाच्या फायबरची बोट जाळून तसेच छिद्र पाडून बोटीचे नुकसान केले असल्याचेही दिसून आले. चोरट्याने संरक्षक कुटीची तोडफोड केली. डिझेल इंजिन, पाण्याची पाइपलाइन, वायरलेस बेस स्टेशन, भांडी, खुर्च्या, सोलर पॅनल आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.
२४ तासात आरोपीस अटक
ही बाब लक्षात आल्यानंतर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वन्यजीव विभागाचे बामणोली येथील वनक्षेत्रपाल हसबनीस यांनी मेढा पोलिसांच्या मदतीने अधिक तपास करून २४ तासांत अविनाश जाधव याला अटक केली. पोलिसांनी चोरीस गेलेल्यापैकी २ बॅटरी, सोलर पॅनेल, टॉर्च आदी साहित्य संशयिातच्या घरातून हस्तगत केले. जाधवने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नशेत केला प्रकार
संशयिताच्या या कृत्यामुळे वन्यजीव विभागाचे तीन लाखांहून अधिक साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जाधव हा वन्यजीव विभागात यापूर्वी वनमजूर म्हणून काही काळ कार्यरत होता. कामावरून कमी केल्याच्या रागातून त्याने नशेत हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात आले.