सातारा : मुख्यमंत्री तीन दिवसांच्या सक्तीच्या रजेवर असल्याच्या चर्चेसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी महाबळेश्वर, तापोळा, दरे भागातील महत्वाच्या कामांसाठी आलो आहे. जनता दरबार घेऊन लोकांचे महत्वाचे प्रश्न सोडविले. अन्य कामांचा आढावा घेत आहे. ती कामे देखील महत्वाची आहेत. जे अडीच वर्षे घरी बसले होते. ते मुख्यमंत्री रजेवर गेल्याची चर्चा करत आहेत. त्यांना काय चर्चा करायची ती करू देत. त्यांच्यासाठी माझ्या डायरीत वेगळे शब्द आहेत. त्याचा योग्य वेळी वापर करेन, असा इशारा शिंदे यांनी दिला.
रेटून नाणार प्रकल्प होणार नाही : बारसू येथे होणारी रिफायनरी ही ग्रीन रिफायनरी आहे. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, अशी अपेक्षा होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला. त्यावेळी असे का केले? तेव्हा काय विशेष तडजोडी झाल्या होत्या का? असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांनी समृद्धी हायवे आणि गेम चेंजर प्रकल्पलाही विरोध केला. चांगल्या कामाला विरोध करणे हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. लोकांच्या संमतीने माती परीक्षण केले जात आहे. लगेच प्रकल्प सुरु होणार नाही. माती परीक्षण झाल्यानंतर त्या प्रकल्पासाठी जमीन उपयुक्त असेल, तरच प्रकल्प सुरु होईल. हा प्रकल्प रेटून होणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वरमधील बेकायदेशीर बांधकामे पाडणार : सातारा जिल्ह्यातील कास आणि महाबळेश्वर ही महत्वाची पर्यटनस्थळे आहेत. जुन्या लोकांची घरे आणि त्यांच्या व्यवसायांना कोणीही हात लावणार नाही. मात्र, दोन्ही ठिकाणचे निसर्ग सौंदर्य धोक्यात आणणारी बेकायदेशीर बांधकामे पाडली जातील, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच बांधकामे पाडण्याचे आदेशही प्रशासनाला दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे. महाबळेश्वरमधील रस्त्यात होणारी नवीन बांधकामे आणि महाबळेश्वरमधील बकालपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.
शिवसेना कागदावर ट्रान्सफर केली : मुख्यमंत्र्यांच्या खासगी दौर्यावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे. कागदावर शिवसेना ट्रान्सफर करून घेतलेले मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर गेले आहेत. त्यांच्या दरे गावातून धूर येत आहे. त्यामुळे शिवसेना ट्रान्सफर करून घेतलेला तो कागद एखाद्या यज्ञात पडला का, हे बघावे लागेल, असा खोचक टोला खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
हेही वाचा : Sushma Andhare News: संकट आल्याने मुख्यमंत्री देवाचा धावा करायला गेले- सुषमा अंधारे