कराड (सातारा) - सातारा जिल्ह्यात आणि विशेषत: कराड तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांसह मृत्यूचा वाढता दर चिंताजनक ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सातार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी सकाळी कराडच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेत कराडच्या प्रशासकीय अधिकार्यांना चांगलेच खडसावले. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि लसीकरण वाढविण्यासह लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.
कृष्णा कारखाना निवडणुकीमुळे संसर्गात वाढ?
गेल्या आठवडाभरापासून सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित आणि बाधितांच्या मृत्यूचा दर वाढला आहे. त्यातच कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला होता. प्रचारात लॉकडाऊनचे नियम पाळले गेले नाहीत. निकालानंतरही मोठा जल्लोष करण्यात आला. त्याचा मोठा परिणाम कोरोना संसर्ग वाढण्यावर झाल्याचे चित्र कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये दिसून आला आहे. हजाराच्या खाली आलेला कोरोनाबाधितांचा आकडा गेली तीन दिवस हजारपार गेला आहे. तसेच मृत्यूदरही वाढला आहे. कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील वडगाव हवेली, रेठरे बुद्रुक, येरवळे, विंग, तारूख, उंडाळे, आटके यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाधित रूग्णांच्या सहवासातील व्यक्ती शोधून त्यांची कोरोना तपासणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
'कडक लॉकडाऊन राहणारच'
कराडच्या विश्रामगृहातील बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नगरपालिका, आरोग्य, महसूल आणि पोलीस यंत्रणेची झाडाझडती घेतली. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक रूग्णसंख्या कराड तालुक्यात आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील सर्वाधिक आहे. लॉकडाऊन शिथील करा, अन्यथा दुकाने उघडण्याचा पवित्राही दोन दिवसांपूर्वी व्यापार्यांनी घेतला होता. परंतु पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अनेक दुकानदारांवर दंडात्मक तसेच दुकाने सील करण्याची कारवाई केल्यामुळे व्यापारी बॅकफूटवर गेले. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन राहणारच, असा इशारा देत कराडमधील प्रशासकीय यंत्रणेला लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
कराड तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर
दोन विधानसभा मतदार संघ असलेला कराड तालुका जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे देखील कोरोना परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. दोन्ही नेते सातत्याने प्रशासकीय अधिकार्यांच्या संपर्कात असतात. आवश्यक त्या सूचना ते वेळोवेळी देतात. परंतु नागरीकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने कराड तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. लॉकडाऊन शिथील करण्याची मागणी विविध घटकांकडून नेत्यांकडे होत आहे. परंतु लॉकडाऊन हा नागरीकांच्या सुरक्षिततेसाठीच असल्याचा पवित्रा नेत्यांनी घेतला आहे. नागरीकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी केले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी कोणतीही तडजोड केलेली नाही. कोरोनावर मात करण्यासाठी नियम पाळावेच लागतील, अशी भूमिका जिल्हाधिकार्यांनी सातत्याने घेतली आहे.
तीन दिवसात 1 हजार 382 बाधित, 25 जणांचा मृत्यू
कराड तालुक्यात सोमवारपासून ते गुरूवारपर्यंतची आकडेवारी पाहता सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित आणि मृत्यू झालेल्यांची सर्वाधिक संख्या कराड तालुक्यात आहे. सोमवारी (दि. 5) आलेल्या अहवालात कराड तालुक्यात 323 जण बाधित आढळून होते, तर 12 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 6) 382 बाधित आणि 8 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 7) 327 जण बाधित 2 जणांचा मृत्यू झाला. गुरूवारी (दि. 8) रोजी 350 जण बाधित आढळले, तर 3 जणांचा मृत्यू झाला. केवळ तीन दिवसात कराड तालुक्यात 1 हजार 382 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत तालुक्यातील कोरोनाबाधितांची आणि रूग्णांच्या मृत्यूची आकडेवारी सर्वाधिक आहे.