सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी राज्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. याच धर्तीवर बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या ( Shiv Sena of Balasaheb ) कराडमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांना फराळ, भेटवस्तू देऊन त्यांची दिवाळी गोड केली. सामाजिक भान जपत दायित्वाच्या भावनेने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना हा उपक्रम राबविला.
'त्यांची' दिवाळी वृद्धाश्रमातच : आई-वडीलांनी मोठ्या कष्टाने पालनपोषण केल्याचा देखील मुलांना विसर पडतो. कुटुंब, मुलं-बाळं असतानाही वृद्धांवर आश्रमात राहण्याची वेळ येते. दिवाळीसारख्या सणातही पोटची मुले आई-वडिलांना न्यायला आश्रमात येत नाहीत. अशा वृद्धांचा सण आश्रमातच साजरा होतो. बाळासाहेबांच्या शिवसेनेने या वृद्धांसोबत दिवाळी साजरी करण्याचे ठरवले. सातारा, कराड तसेच सांगली जिल्ह्यातील नेर्ले येथील वृद्धाश्रमात जाऊन फराळ, भेटवस्तू दिल्या. वृद्धांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव पाहून आमची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाल्याचे सातारा जिल्हा महिला शिवसेनेच्या उपसंघटीका सुलोचना पवार यांनी सांगितले.
काही आश्रमांमध्ये सुखद चित्र : सातारा आणि कराड परिसरातील दोन वृद्धाश्रमांमधील बऱ्याच वृद्ध माता-पित्यांना मुलांनी दिवाळी सणासाठी आपल्या घरी नेल्याचे सुखद चित्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पाहायला मिळाले. मात्र, काही वृद्धांना न्यायला कोणीच आले नव्हते. त्यांना शिधा, फराळ, पणती, उटणे आणि भेटवस्तू देऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. आश्रमातील वृद्धांसोबत गप्पा मारल्या. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, सातारा जिल्हा महिला शिवसेनेच्या उपसंघटीका सुलोचना पवार, कराड उपतालुकाप्रमुख दादासाहेब जाधव, कराड शहरप्रमुख राजेंद्र माने, उपशहर प्रमुख संदीप थोरवडे, गणेश भोसले, गौरव खराडे, सूरज सावंत, अजय जामदार उपस्थित होते.