सातारा - ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज 388 पैकी एकूण 87 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने, महाबळेश्वर तालुक्यातील 42 पैकी 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील उर्वरीत 9 ग्रामपंचायतींसाठी अंशत: तर 5 ग्रामपंचायतींच्या सर्व जागांसाठी मतदार घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुषमा चौधरी यांनी दिली.
296 जागांसाठी 393 अर्ज
महाबळेश्वर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 42 ग्रामपंचायतींच्या 296 जागांसाठी तालुक्यातून 393 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र बाद ठरवण्यात आल्याने एकूण 388 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 87 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध होणार आहेत.
9 ठिकाणी अंशत: निवडणूक
भिलार येथे सहा जागांसाठी, सौंदरी येथे पाच जागांसाठी तर आकल्पे, कोट्रोशी व आंब्रळमध्ये सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर कासवंड, गोडवली, कुरोशी, दांडेघर, क्षेत्र महाबळेश्वर, राजपुरी, खिंगर, वाळणे व कुंभरोशी या 9 ग्रामपंचायतींच्या काही जागांसाठी निवडणुका पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार सुषमा चौधरी यांनी दिली आहे.