कराड (सातारा) - कोयना धरण परिसर शनिवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाची तीव्रता 3.1 इतकी नोंदली गेली आहे.
कोयना धरण परिसरात आज सकाळी 10 वाजून 22 मिनीटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13.60 किमी अंतरावर तर वारणा खोऱ्यातील चिखली या गावाच्या ईशान्य दिशेला 10 किमी अंतरावर होता, भूपृष्ठापासून 8 किमी खोल भूगर्भात हे केंद्र होते.
शनिवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोयना धरणाला कसलाही धोका पोहोचलेला नाही. धरण सुरक्षित आहे, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
कोयनानगरसह पाटण तालुक्यात हा भूकंप जाणवला. भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना आणि पाटणवासीयांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यापूर्वीही कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला आहे.