सांगली - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी रात्री नऊ वाजताच्या सुमारास 21 फुटावर पोहोचली आहे. तर संततधार पावसाचा आणि संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्ती यंत्रणा सज्ज झाली आहे. पूर पट्ट्यातला नागरिकांना पालिकेकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - मोठी दुर्घटना टळली: रेवदंडाजवळ जेएसडब्ल्यूची बार्ज समुद्रात बुडाली, 16 खलाशांना वाचवण्यात यश
कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ -
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत सकाळी पाण्याची पातळी हे सात फुटांवर होते आणि रात्री 10वाजेपर्यंत या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने, ती 21 फुटांपर्यंत पोहोचली होती. पाण्याची पातळी वाढल्याने कृष्णा नदीवरील नागठाणे आणि सांगलीवाडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील कोकरूड, रेठरे बंधारे पाण्याखाली गेले आहे. तसेच येळापुर-समतानगर पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.