सांगली - महागाईच्या निषेधार्थ सांगलीमध्ये मदन पाटील युवा मंच यांच्यावतीने केंद्र सरकारविरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. थेट नरेंद्र मोदी यांना कौल लावत,"देवा नरेंद्र, केंव्हा आम्हाला पावेंद्र" अश्या पद्धतीने महागाई कधी कमी होईल? असा सवाल करत आंदोलन करण्यात आले.
"देवा नरेंद्र ,केंव्हा आम्हाला पावेंद्र" -
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाची दरही भरमसाठ वाढले आहेत. पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. सर्वसामान्य जनता आज कोरोनाच्या संकटात होरपळून निघत आहे,अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग करत असल्याची आरोप करत सांगलीतील मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अनोख्या पद्धतीने करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये थेट नरेंद्र मोदींना कौल लावण्याचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टर समोर मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने धार्मिक विधी पार पाडत "देवा नरेंद्र, केंव्हा आम्हाला पावेंद्र" पेट्रोल-डिझेल-गोडेतेल केंव्हा कमी होणार? असा उपहासात्मक सवाल उपस्थित करत वाढत्या महागाई निषेध नोंदवण्यात आला. मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरेंच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड येथील पेट्रोल पंपा समोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले.