सांगली - बोअरवेलची वाहतूक करणारा ट्रक आणि छोटा टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना कराड-पंढरपूर महामार्गावरील आटपाडीच्या विभुतवाडीजवळ शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात गणेश फडतरे आणि महेश फडतरे या दोघांचा मृत्यू झाला. मृत दोघेही सातारा जिल्ह्यातील कोरगावचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परशी पुलाच्या वळणावर समोरासमोर झाली धडक
विभूतेवाडी येथील गावाजवळ असलेल्या परशी पुलाच्या वळणावर ट्रक आणि टेम्पोची समोरा-समोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला. टेम्पोमधील गणेश फडतरे आणि महेश फडतरे हे दोघेही ठार झाले, तर निशांत फडतरे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुकानातील साहित्य पोहोचवून जात होते परत
महेश फडतरे यांचे शेतकरी कृषीयंत्र नावाचे दुकान आहे. त्यातील साहित्य पोहोच करण्यासाठी ते आटपाडी भागात आले होते. माल पोहोच केल्यानंतर विक्रीसाठी फडतरे हे परत कोरेगावकडे पंढरपूर-कराड महामार्गावरून निघाले होते. यावेळी विभूतेवाडी याठिकाणी पोहोचले असता पुलाच्या जवळ वळणावर त्यांची छोटा हत्ती टेम्पो आणि भरधाव बोअरवेल ट्रकची समोरा-समोर धडक झाली. या आपघातानंतर ग्रामस्थांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दखल केले. ज्यामध्ये मायणी येथे उपचारासाठी घेऊन जाताना महेश फडतरे यांचा मृत्यू झाला आहे. तर आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना गणेश फडतरे यांचा मृत्यू झाला आहे.
परशी पुलाजवळ अत्यंत धोकादायक वळण
विभूतेवाडी गावानजीक असणाऱ्या परशी पुलाजवळचे वळण अत्यंत धोकादायक असून याठिकाणी गेल्या काही महिन्यांमध्ये 3 अपघात घडले आहेत. तर हा चौथा अपघात असून येथील धोकादायक वळण ऐवजी सरळ रस्ता करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिकांनी केली आहे.