सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजमती ट्रस्ट आणि जैन समाजाच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 5 दिवसात मुलींच्या हॉस्टेल मध्ये 70 बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारले गेले असून, आतापर्यंत 100 हुन अधिक कोरोना रुग्ण बरे होऊन परतले आहेत.
राजमती ट्रस्ट आणि जैन समाजाचा मदतीचा हात
दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णालये कमी पडत आहेत, त्यामध्ये ऑक्सिजन बेडची मोठी कमतरता भासत आहे. अशा स्थितीत आता सांगलीकर जनतेच्या मदतीला सामाजिक संस्था धावून येत आहेत. सांगलीतील राजमती नेमगौंडा पाटील ट्रस्ट आणि जैन समाजाच्या माध्यमातून विश्रामबागच्या राजमती भवन जवळ कोरोना हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
मुलींचे होस्टेल बनले कोविड हॉस्पिटल
माजी महापौर व राजमती नेमगौंडा पाटील ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधीलकी जोपासत 70 बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. यामध्ये 15 आयसीयू तर 25 ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे अवघ्या 5 दिवसात कोरोना सेंटर उभारले गेले आहे. तर लठ्ठे शिक्षण संस्थेच्या मुलींच्या वसतिगृह आणि महाविद्यालयात हे कोरोना हॉस्पिटल सुरू असून, याला श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटल असे नाव देण्यात आले आहे.
100 हुन अधिक कोरोना रुग्ण झाले बरे
याबाबत माजी महापौर व ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, आज जिल्ह्यामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन दहा दिवसांपूर्वी राजमती ट्रस्ट आणि जैन समाजाच्या माध्यमातून आणि कोरोना हॉस्पिटल निर्माण करण्याचे ठरवले. यासाठी लागणारे साहित्य हे समाजातल्या दानशूर व्यक्तींकडून मिळवले, ज्यामध्ये अगदी वैद्यकीय उपकरणांपासून आर्थिक स्वरूपाची मदत जैन समाजासह इतर समाजाने केली. त्यामुळे अवघ्या पाच दिवसात रात्रंदिवस काम करून याठिकाणी सर्व सुविधायुक्त असे कोरोना हॉस्पिटल उभारले गेले आहे. याठिकाणी गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत, आतापर्यंत 100 हून अधिक कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उद्देशाने शैक्षणिक व इतर सामजिक संस्थांनी भगवान महावीर कोविड हॉस्पिटल आदर्श मानून, कोरोना हॉस्पिटल उभारण्याची गरज असल्याचे सुरेश पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा - रुग्णालयात दाखल होण्याकरता कोरोनाची चाचणी बंधनकारक नाही-आरोग्य मंत्रालय