सांगली - रोज 10 किमी पायी शाळा गाठून मेंढपाळाच्या पठ्ठ्याने दहावीच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळवले. हेमंत मुढे असे हे अभिमानास्पद यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या परिसरात असलेल्या शेंडगेवाडी येथील राहणारा आहे. विशेष म्हणजे गावाला रस्ता नसल्याने रोज खडतर वाटेवरुन पायी जात आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्याने हे यश मिळवले. त्यामुळे हेमंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रोज पायी 10 किलोमीटर जात घेतले शिक्षण - आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मेंढपाळ कुटुंबातील हेमंत बिरा मुढे या मुलाने दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दहावीत त्याने 91.80 टक्के इतके गुण मिळवले आहे. बोर्डात टॉपर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे गुण कमी जरी असले तरी, त्यांने ज्या परिस्थितीतून हे यश मिळवले आहे, ते वाखाणण्या जोगे आहेत. हेमंतच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आणि हलाखीची आहे. त्याचे आई-वडील हे मेंढपाळ आहेत. शेळ्या मेंढ्या चारुन त्याच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मेंढपाळीच्या व्यवसायातूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण दिले. अंकुश हा मोठा तर हेमंत हा या दाम्पत्याचा धाकटा मुलगा आहे. दोघांचेही शिक्षण वडील बिरा व आई सुनंदा मुढे यांनी गावोगावी शेळ्या-मेंढ्या चारुन केले आहे. आई-वडिलांच्या अपार कष्टाची चीज हेमंतने दहावीत नेत्रदीपक यश मिळवून केले आहे.
खडतर वाटेवरुन शिक्षणाचा प्रवास - हेमंत हा शेंडगेवाडीपासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कामथ गावातील शाळेत शिकतो. ज्ञानदीप विद्यामंदिर याठिकाणी पाचवीपासून हेमंत दररोज शाळेला जातो. मात्र शाळेला जाण्याचा त्याचा प्रवास हा थक्क करणारा आहे. गावातून कामथपर्यंत पाच किलोमीटरचा प्रवास हा खूपच अवघड आहे. याठिकाणी रस्ताच नाही. पायवाट प्रमाणे खडकाळ असणाऱ्या रस्त्यातून वाहन देखील जात नाही. त्यामुळे हेमंत दररोज शाळेसाठी पाच किलोमीटर पायी जाऊन पुन्हा पाच किलोमीटर पायी घरी येत होता. असा रोज त्याचा शिक्षणासाठी प्रवास राहीला आहे. कधी-कधी सायकल घेऊन शाळेत जायचा, पण बहुतांश वेळी हेमंतला पायपीटचं करावी लागली आहे. मात्र दररोजचा दहा किलोमीटरचा खडतर प्रवास हेमंतने आपल्या शिक्षणाच्या आड कधीच येऊ दिला नाही. जिद्दीने हेमंतने रोजचा दहा किलोमीटरचा पायी प्रवास करत दहावीपर्यंत शिक्षण तर घेतले. इतकेच नाही तर, दहावीमध्ये 91.80 टक्के इतके गुण मिळवले. ज्या परिस्थितीमधून हे त्याने गुण मिळवले ते पाहता, हेमंतने मिळवलेले गुण टॉपर विद्यार्थ्यांपेक्षाही नक्कीच काकणभर सरस असल्याचे म्हणावे लागेल.
सर्व स्तरातून हेमंतवर कौतुकाचा वर्षाव - हेमंतने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाचे आत तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हेमंतचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेक स्तरावरून हेमंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.