शिराळा (सांगली) - शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, साहित्य आणि आवश्यक सुविधा यांची माहिती द्या. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. शिराळा तहसीलदार कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, विराज नाईक, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे उपस्थित होते.
जिल्ह्यात किती पवचक्क्या आहेत, त्यातील किती बंद आणि किती सुरू आहेत याची माहिती प्राधान्याने घेण्यात यावी. बंद पवनचक्क्यांची खरेदी करून त्याची वीज शेती पाणी पुरवठा योजनेस वापरल्यास शेतकऱ्यांना वीज बिलाबाबत दिलासा मिळेल, अशा सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि इतर रिक्त पदांची तसेच साहित्य, आवश्यक सुविधा यांची माहिती त्यांनी मागितली. स्वत: हा प्रश्न मार्गी लावू, असे पाटील म्हणाले. वाकुर्डे योजनेस भरपूर निधी दिला आहे, त्यामुळे हे काम वेगात पूर्ण करा. बंद ट्रान्सफॉर्मर, शेती वीज कनेक्शन त्वरित द्या, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी आमदार नाईक यांनी या परिसरात बिबट्या, गवे आढळत आहेत. रात्री शेतकरी शेतात पाणी देण्यास भीत आहेत. त्यामुळे दिवसा दोन तास ज्यादा वीज द्यावी अशी मागणी केली. तसेच कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले असून तात्पुरते प्राथमिक आरोग्य केंद्र ही त्याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.