सांगली - आर आर पाटील आणि माझं नेहमी भांडण राहील. माझ्या जाण्याच्या आधी आबा मला सोडून गेले, याचं दुःख माझ्या अंतकरणात कायमच राहील, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तासगावमध्ये शरद पवार यांच्या हस्ते माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पवार यांनी यावेळी बोलताना आर आर आबांच्या आणि त्यांच्या पहिल्या भेटीचे आणि जिल्हा परिषद निवडणुकीबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. पवार म्हणाले, त्यांच्यावर ज्या-ज्या जबाबदाऱ्या आपण सोपवल्या त्या त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडल्या. आबा म्हणजे कर्तृत्ववान असा हिमालयाएवढा नेता होता. महाराष्ट्र कधीही आबांना विसरू शकणार नाही. आबांना आपण डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. पण आबांनी काळजी घेतली नाही. कुणाचे सल्ले ऐकले नाहीत. त्यांना आम्हाला सोडून जायचा अधिकार होता काय?, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार अतिशय भावनिक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
तर, सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत बोलताना "आर आर पाटील यांची उणीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच भासत आहे. आबांचे आणि माझे संबंध एका जिल्ह्यातले असल्यामुळे अत्यंत जिव्हाळ्याचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात मोठी करण्यात आबांचा वाटा खूप मोठा होता", अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केल्या.
माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तासगावमध्ये शानदार सोहळ्यात लोकार्पण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, आमदार मोहन कदम, आमदार सुमन पाटील यांच्यासह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.